विजय शिंदे
माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु राज्यात सरकारच्या विरोधात असणारी सूप्त लाट इंदापुरातही दिसून आली.भाऊ -मामांचा प्रयत्न तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकासाची दुरदृष्टी मतदारांनी नाकारली.
आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मानणारा इंदापूर तालुक्यात मोठा वर्ग आहे. पाटील व भरणे या दोन्ही नेत्यांचे ठरलेले एक मतदानाचे पॅकेज आहे. परंतु महाराष्ट्रात असणारा सरकार विरोधाचा रोष या दोन्ही नेत्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवून गेला.
दोनी नेते कार्यकर्त्यांना व मतदारांना आवाहन करत असताना विधानसभेला तुम्हीच पण आता काय सांगू नका, ही भूमिका मतदारांची व काही कार्यकर्त्यांची दिसून आली.
संविधान धोक्यात असल्याचा विरोधकांचा प्रचार..
राज्यात व देशात विरोधकांनी संविधान धोक्यात असल्याचा केलेला प्रचार त्या विरोधात रोष इंदापुरातही मतदानावेळी दिसून आला, या वेळी दलित समाजासोबतच इंदापूर शहर व ग्रामीण भागातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडला.
ईडी-सीबीआय कारवाई
ईडी-सीबीआय या संस्थांचा घरगडी असल्यासारखा वापर होत असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या मागे राज्यात ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आल्याचे आरोप झाले. दस्तूरखुद्दा शरद पवारांनी मुंबईत केलेल्या खास आंदोलनामुळे मात्र केंद्रीय संस्थांच्या तोंडचे पाणी पळाले होते. विरोधकांना जेरीस आणण्यासाठी या संस्थांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.
ऑपरेशन लोटस
मोठे बहुमत असताना भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले होते. त्यातच भाजपने ऑपरेशन लोटस चालवले. अगोदर शिवसेनेला सुरुंग लावला. सुरत, आसाम ते गोवामार्ग हे नाट्य अवघ्या देशाने पाहिले. एका गटासोबत घरोबा करत सत्तांतर घडविले. तर काही दिवसांनी राष्ट्रवादीचा गड फोडला. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या बद्दल एक सहानुभूती निर्माण झाली होती. या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नसल्याचे मतातून दिसून आले.
मराठा फॅक्टरचा फटका
मराठवाड्यातील आठ जागांचे निकाल समोर ठेवत मराठा फॅक्टरचा मोठा फटका भाजपला बसला. लाभार्थी नसणारा तसेच ज्यांची मुले शिक्षण घेतात व नोकरीच्या शोधात आहेत अशा मराठा समाजाच्या मतदारांनी सरकारविरुद्ध आपला रोष दाखवून दिला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे इंदापूर शहर व ग्रामीण भागातील मराठा समाज एकवटला असल्याचे मतभेटीतून दिसून आले.
शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट
शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका भाजपला बसला. केंद्रातील सरकारने तीन महिन्याला दोन हजारांची मदत सुरु केली असली तरी करामुळे खत, बियाणं, शेती आवजारं आणि इतर साहित्य महाग झाले. त्यातच शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही. तर निर्यातीसंबंधीचे तळ्यातमळ्यातील धोरणाने भाजपने शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली.