माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल.

विजय शिंदे

बारामती, दि. ८: अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे प्राप्त झालेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. यमपल्ले यांनी शिक्रापूर, यवत, दौंड, इंदापूर व बारामती येथील वैद्यकीय अधीक्षकांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे यांचे समुचित अधिकारी डॉ. महेश जगताप आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज बोडके यांनी सापळा रचून डॉ. मधुकर शिंदे आणि दलाल नितिन बाळासाहेब घुले यांना पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासहित पकडले. त्यांची विचारपूस केली असता डॉ. शिंदे यांनी दलाल श्री. घुले यांच्या मदतीने मौजे माळेगाव येथे एका महिलेची अवैधरित्या गर्भलिंग चाचणी केल्याचे सांगितले. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाणे येथे डॉ. जगताप यांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही कार्यवाही आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांगे करीत आहेत, अशी माहिती डॉ. यमपल्ले यांनी दिली.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here