विजय शिंदे
वडापुरी 3 मार्च // बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षाचे नेते राष्ट्रवादीला पर्यायाने अजित पवारांना आव्हान देताना दिसत आहेत.भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे व पुत्र राजवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आव्हानाची भाषा केली होती, आता तीच भाषा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे वापरताना दिसून येत आहेत. विधानसभेचा विचार केला नाही, तर नेत्यांनी सांगितलं तरी लोक ऐकतील, असं मला वाटत नाही, असे विधान शिवतारे यांनी केले आहे.
विधानसभेची भूमिका क्लीअर झाल्याशिवाय तोपर्यंत सबुरीचे धोरण असणार आहे. आज ना उद्या ते क्लीअर होईल. त्यासंदर्भात सीएम आणि डीसीएम निर्णय घेतील. माझ्याबाबतचं वाक्य तर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेबाबतचं क्लीअरन्स देतील, त्याचवेळी त्याच्यातून निश्चितपणे मार्ग निघेल, असेही शिवतारे म्हणाले.
माजी मंत्री शिवतारे म्हणाले, माझ्याविरोधात ज्यावेळी अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. त्यावेळी आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधकच होतो. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे एकमेकांच्या इंटरेस्टचा तुम्ही विचार केला तरच लोक मदत करतील. एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार केला नाही, तर मला वाटत नाही की नेत्यांनी जरी सांगितले तरी कोणी ऐकेल, अशी सध्याची परिस्थिती नाही.
विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेचे काम करू, अशीच सर्वत्र परिस्थिती आहे. डिप्लोमेटिकली सर्वांना बरोबर हॅंडलिंग करावं लागेल. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं तर आता होणारच नाही, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याशी माझी फार इंटराक्शन फार नाही. अजितदादांना शब्द पाळणारा नेता म्हणूनच राज्यभर ओळखले जाते. शब्द पाळत नाहीत, असं कधी होत नाही. पण इंदापूरच्या बाबत झालं आहे, हे सर्वज्ञात आहे, असेही शिवतारे यांनी नमूद केले.
फडणवीस अजितदादांना देणार मोठी जबाबदारी; बारामतीच्या रोजगार मेळाव्यात सूतोवाच
ते म्हणाले, राजकारणात एखादं नॅरेटिव्ह सेट करायचे असेल किंवा एखाद्याची बदनामी करायची असेल तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठासून बोलली पाहिजे. भ्रष्टाचार झालाच असेल, तर त्यातून पुढे काहीतरी आलं पाहिजे ना. भ्रष्टाचार म्हणजे पैशाची देवाण- घेवाण असते. तशी ट्रांझक्शन समोर आली पाहिजेत. नुसतं भ्रष्टाचार झाला असं म्हणत असताना त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले आहे, हे महत्त्वाचे आहे, असे उत्तर अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणावर दिले.
आरोप हा राजकारणाचा भाग आहे. कधी कधी वाल्याचा वाल्मीकीही होतो. विकासासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याच्या हेतूने मी भाजपसोबत येत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. राजकारणात भ्रष्टाचाराचे आरोप तर होतच असतात. आरोपाची शहानिशा कागदपत्रावरून होत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.