विजय शिंदे
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत असताना दुसरीकडे भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. आघाडीचं अजून जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे.त्यानंतर आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं एक मोठं विधान आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर आमच्यासोबत आले तर त्यांना माढाची जागा सोडली जाऊ शकते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात जानकर यांची चांगली ताकद आहे. धनगर समाज जानकर यांच्या बाजूने आहे. जानकर यांचा एक आमदारही आहे. महायुतीत जानकर यांना डावललं गेल्याचं चित्र आहे.
महायुतीत जानकर यांना लोकसभेची जागा मिळणार नसल्याचं चित्र असल्यानेच जानकर यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जानकर यांना सोबत घेण्याची भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जानकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जानकर महाविकास आघाडीसोबत गेल्यास त्यांचा संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याबाबत माजी मंत्री महादेव जानकर ही सकारात्मक असल्याची चर्चा सुरू आहे.