विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील विद्यार्थी जिद्दी असून, ध्येयपूर्ती साठी मेहनत घेत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमधून होणारी निवड तसेच इ.10 वी व 12 वी. मधील गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली वाढ तसेच नीट, सीईटी आदी परीक्षांमधील यशाचा चढता आलेख पाहता, इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे रविवारी (दि.16) काढले.
इंदापूर येथे वाघ पॅलेस मध्ये इंदापूर तालुक्यातील इ.10 वी व 12 वी.मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शानदार कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये सन 1952 मध्ये ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज या तिन्ही संस्थांमध्ये सुमारे 35 हजार विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे, प्रोत्साहन देण्याचे व विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम केले जात आहे.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. जीवनामध्ये संस्कार मूल्ये निर्माण करून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे काम शिक्षण करीत आहे. यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान शिक्षणातून मिळत आहे. पालकांनीही मुलांचा कल व आवड तसेच बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, त्यांच्या शिक्षणाच्या शाखा निवडल्या पाहिजेत.
इंदापूर तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. या स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षण संस्थांच्या मार्फत सहकार्य केले जात असून, इंदापूर येथे रात्रीची अभ्यासिका सुरू केली जात आहे, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या शानदार सोहळ्यात इंदापूर तालुक्यातील 101 माध्यमिक शाळा व 47 जुनियर कॉलेज पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमधून निवड झालेल्या युवक विद्यार्थ्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अँड. मनोहर चौधरी यांनी केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे व नितीन भोसले यांनी केले.
_____________________________