विजय शिंदे
पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या व राज्यात सर्वाधिक काळ मंत्रीपद कायम राहिलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये सर्वपक्षीय इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले असून, ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा निर्धाराने कामाला सुरूवात केली आहे.
विशेष म्हणजे, महायुती, महाविकास आघाडी,व अन्य पक्षाच्या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली असून, ही निवडणूक तीरंगी- चौरंगी नव्हे, तर बहुरंगी होईल, अशी शक्यता आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये मराठा, धनगर माळी, वंजारी, अनुसूचित जाती-जमाती आणि अल्पसंख्याक घटकांतील मतदारांचा समावेश होतो.
इंदापूर विधानसभेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने हे सुद्धा महायुती कडून इच्छुक आहेत.
महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी सांगितले असून आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस व अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले असल्याने भरणे व पाटील यांच्यात कशा पद्धतीने महायुती तोडगा काढणार, याकडे इंदापूरकरांचे लक्ष आहे.
महायुती व महाविकास आघाडी यांची उमेदवारांची अधिक स्पष्टता नसली तरी सर्वच उमेदवारांना अंतिम क्षणाची वाट पहावी लागणार आहे. असे असले तरी इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे.लग्नसराई, वाढदिवस, धार्मिक कार्य, दुःखद प्रसंग व घरगुती समारंभ यासाठी उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
यापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात सलग तीन वेळा लढती झाल्या आहेत यामध्ये २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा पराभव केला होता. परंतु नंतर झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कडून आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाटील यांच्यावर विजय मिळवला.पाटील व भरणे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असून पराभव होणाऱ्या उमेदवारासाठी ही शेवटची निवडणूक असू शकते. त्यामुळे महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार.? दोन्ही नेत्यांमध्ये काय तोडगा निघणार.? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
२०१४ पासून विधानसभा लढवण्यासाठी संधीच्या शोधात असणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्या संधीचा फायदा जगदाळे कसा उठवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इच्छुकांची संख्या वाढली असून कोण कोणत्या चिन्हावर.?कोणत्या पक्षाकडून.? लढेल हे मात्र अजून गुलदस्तात असल्याने तालुक्यातील जनता मात्र संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे.