विजय शिंदे
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत रविवारी (दि. 23) भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, उजनी पाणलोट क्षेत्रा (बॅक वॉटर) तील पूल व इतर विकास कामांसंदर्भात नितीन गडकरी यांचेकडे हर्षवर्धन पाटील यांनी विविध मागण्या सादर केल्या.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्यामध्ये अवघ्या 10-15 दिवसांमध्ये आगमन होत आहे. तरीही या पालखी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास हा अपूर्ण कामांमुळे अडचणीचा होणार असे दिसत आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देणेसाठी पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवरती करणे, तसेच पर्यायी व्यवस्था करणेसंदर्भात यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर पालखी महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तेचा दर्जा टिकवला जात नसल्याच्या जनतेकडून होत असलेल्या तक्रारीवरही यावेळी मंत्री नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा झाली.
तसेच उजनी जलाशयामध्ये नुकतीच बोट पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला. करमाळा व इंदापूर तालुक्यात ये-जा करणेसाठी रस्त्याच्या मार्गाने तब्बल 80-90 कि.मी.चा प्रवास करावा लागतो; मात्र जलमार्गे हेच अंतर फक्त 4 – 4.5 कि.मी. असलेने बॅक वॉटर परिसरात पूल उभारण्याची मागणी आहे, त्यासंदर्भात तातडीने सर्व्हेक्षण होऊन, सर्व्हेनुसार योग्य ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरु व्हावे, अशी मागणीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. या सर्व मागण्यांवरती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करणेसंदर्भात सूचना दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.