विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीनंतर इंदापुरात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महायुती मध्ये इंदापूर च्या उमेदवारीवरुन घमासान होणार असल्याचे चित्र आहे. अशा गरम वातावरणात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर कार्यकर्त्यांनी यंदा मैदानात तयारीनिशी उतरण्याचा चंग बांधला आहे. अशातच सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते फोटोसह ‘मिशन 2024’ असे स्टेटस ठेवून आपल्या नेत्याची उमेदवारी फिक्स असल्याचा दावा ठोकत आहे.
इंदापूर विधानसभेसाठी आ दत्तात्रय भरणे यांचीच उमेदवारी निश्चित असल्याचे बॅनर इंदापूर परिसरात लागले आहेत. तिकडे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्तेही अंतर्गत तयारीला लागले असल्याने इंदापूरात महायुतीला खो बसण्याची चिन्हे आहेत.
इंदापूरात महायुतीत विधानसभेच्या उमेदवारी वरुन चांगलेच घमासान पाहायला मिळणार असून महायुतीकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने हे महायुतीचे इच्छूक विधानसभा उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे यंदा कुणालाही उमेदवारी मिळाली तरी उमेदवारी न मिळाल्यास तो शांत बसणार नाही हेही महत्त्वाचे आहे.