माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांची मुंबईत भेट.

विजय शिंदे

गावोगावचा मोठा वर्ग हा दुग्ध व्यवसायावरती अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हा प्रश्न हाताळून दुधाचा खरेदीचा दर प्रति लिटरला किमान रु. 35 करावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे भेटीप्रसंगी मुंबईत बुधवारी (दि.26) केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, दुग्ध व्यवसाय हा महिला, तरुण वर्ग, शेतकरी, भूमीहीन शेतमजूर आदी मोठा वर्ग कष्टाने करून उपजीविका करीत आहे. मात्र सध्या दुधाचा दर हा प्रति लिटरला रु. 27 – 28 पर्यंत खाली आल्याने दुग्ध व्यवसाय करणारा राज्यातील हा मोठा वर्ग अडचणीत आला आहे. दुधाचा किमान खरेदी दर हा प्रति लिटरला 35 रुपये असला पाहिजे व हा दर खाली आला तर राज्य शासनाने मध्यंतरी दोन महिने दिले तसे प्रति लिटर अनुदानही दूध उत्पादकांना दिले पाहिजे.
उसाला जसा दराबाबत एफ.आर.पी. चा कायदा आहे, तसा दूध खरेदी दराबाबतही किमान दराचा कायदा असायला हवा, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे व्यक्त केले. राज्यात गेली अनेक दशकांपासून दुग्ध व्यवसाय हा सर्वसामान्य जनतेची चळवळ बनली आहे. महिलावर्ग या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर असून, गोरगरीब जनतेचे प्रपंच दुध व्यवसायावरती अवलंबून आहेत. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावून दूधाचा खरेदी दर किमान रु. 35 करावा, अशी मागणी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यांनी या भेटीमध्ये केली. दरम्यान, राज्य शासन दूध दराच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिली.
____________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here