विजय शिंदे
राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेला राज्यात महायुतीला अपेक्षित असा विजय मिळवता आला नाही, त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार?याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतही इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जोरदार तयारी होऊ लागली आहे.
इंदापूर विधानसभेसाठी महायुतीकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या दोघांनीही दावा केला आहे. महायुतीतील इंदापूर विधानसभेच्या जागेचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार घेणार असले तरी इंदापूर ची जागा ही विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना सुटणार अशी एक अटकळ तालुक्यात बांधली जात आहे.
काही झाले तरी विधानसभा लढवायची व जिंकायची या इरेला पेटलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांचे काम करूनही “येरे माझ्या मागल्या” अशीच काहीशी अवस्था होणार असल्याची चर्चा सध्या इंदापूर तालुक्यात सुरू आहे .
महायुतीची जागा आमदार दत्तात्रय भरणे यांना सुटली तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे १९९५ ची पुनरावृत्ती करून अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार काय निर्णय घेतात याकडे हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसून येत आहेत.
महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेणार असून हा फक्त इंदापूर मतदार संघातील प्रश्न नसून २८८ मतदारसंघात उमेदवार निवडताना कसरत करावी लागणार असल्याचे पाटील यांनी बोलून दाखवले आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून शिवसेना -राष्ट्रवादी व भाजप एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने अनेक मतदारसंघात उमेदवार निवडताना मोठी कसरत पक्ष नेतृत्वाला करावी लागणार आहे. यातच तीन पक्ष एकत्र आल्याने विद्यमान आमदारांना संधी देण्याचे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
महायुतीतील इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना गेल्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागणार आहे. महायुतीत होणाऱ्या घडामोडी कडे राष्ट्रवादी काँग्रेस(SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष लक्ष असून महायुतीतील उमेदवार निश्चित झाल्यानंतरच शरद पवार आपले पत्ते टाकतील असा अंदाज इंदापुरात वर्तवला जात आहे.
१९९५ ची पुनरावृत्ती होणार.?
१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी विद्यमान आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली यामध्ये ते विजयी झाले,त्यावेळी त्यांनी मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. नंतरच्या काळातही १९९९,२००४ अपक्ष निवडणूक लढवत हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.
इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यास हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी इच्छा कार्यकर्ते भेटून व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीची जागा कोणाला जाते व हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे.
या कारणांमुळे आमदार भरणे यांची महायुती कडून उमेदवारी फिक्स…?
* राष्ट्रवादी काँग्रेस मधील तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकमेव धनगर समाजातील आमदार
• विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून भरणे यांची ओळख.
• राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटी नंतर खा.शरद पवार यांना डावलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय.
• लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना केलेला थेट कडवा विरोध.