श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी इंदापूर सज्ज.

विजय शिंदे

आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूरातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडीच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी दिली.


पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. अभय तिडके यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, डॉ. सुरेखा पोळ, संतोष बाबर यांच्या नियंत्रणाखाली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, योग्य औषधोपचार मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मार्गावरील विविध ग्रामपंचायत, हॉटेल्स, खाजगी दवाखाने यांना लेखी सूचना करण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी, काटी आणि शेळगाव अंतर्गत तातडीची वैद्यकीय सुविधा, पुरेसा औषधसाठा, बाह्य व आंतररुग्ण विभाग, रुग्णवाहिका इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक कीटकजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये पालखी मार्गा वरील गावांमध्ये कंटेनर सर्वे, डेंग्यू-मलेरिया डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, गप्पी मासे पैदास केंद्र स्थापित करणे, टँकर तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून घेणे, मार्गालगतच्या हॉटेल्स मधील कामगारांची वैद्यकीय तपासणी करून परिसर तसेच अन्नद्रव्य स्वच्छतेबाबत हॉटेल मालकांना योग्य ती माहिती देणे इत्यादी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

भाविकांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहाय्यिका, आरोग्य सेवक व सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषधनिर्माण अधिकारी, वाहनचालक व संगणक तज्ज्ञ, आशा प्रवर्तक व आशा स्वयंसेविका आणि परिचर व इतर आरोग्य कर्मचारी असे मिळून एकूण ९ पथके तयार करण्यात आली असून याठिकाणी शांताराम काशीद, देवेंद्र उत्तेकर, शंकर जगताप, बनसिद्ध कुंभार, गिरीश जगताप, आशिष कोळेकर, श्रीम. रेणुका जाधव, श्रीम. शालन नवले, श्रीम. कल्पना बुधावले या स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here