कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध;प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित.

विजय शिंदे

महाराष्ट्र राज्यातील तब्बल १५८८ ग्रामपंचायतींची मुदत या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. मात्र लोकसभा निवडणूक कार्यक्रमामुळे या ठिकाणी निवडणुका झाल्या नसल्याने ग्रामपातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत.त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने ग्रामपंचायत निवडणुका चा बिगूल ऑगस्ट महिन्यात वाजण्याची शक्यता आहे.

२०२४ या वर्षाचे पहिले सहा महिने लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीने ढवळून निघाले. आता पावसाळा सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. १ जानेवारीपासून ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान राज्यातील १५८८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

निवडणुकांना मुहूर्त कधी?

अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूक झाली नसल्याने तेथे प्रशासक राजवट लावण्यात आलेली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतींवर पुढील काळात प्रशासक बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायत निवडणुकांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावा-गावांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आधीपासून सुरुवात केलेली आहे.

राज्यात मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार ९ जुलै ते १५ जुलै पर्यंत असणार आहे अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी शुक्रवार १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.असे पत्र सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र सुरेश काकाणी यांनी प्रसिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here