भूर भूर भूर भूर वाजतं काय.. हर्षवर्धन भाऊंचे विमान आलं ग बाय..

विजय शिंदे

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे.
यामुळे या निवडणुकीत शत्रू कोण, मित्र कोण, झेंडा कोणाचा घ्यायचा आणि खांद्यावर पालखी कोणाची घ्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अद्याप उमेदवार निश्‍चित नसला तरी तालुक्यातील महायुती, महाआघाडी, संघटना आणि अपक्ष अशी चौरंगी लढत पाहण्यास मिळणार असे चित्र निर्माण झाले आहे.

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस चे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील दोघेही इच्छुक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बंद दाराआड बऱ्याच वेळ खलबते झाली, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचे काम केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे इंदापूर विधानसभेचा निर्णय घेतील असे ठरले असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले तर आमदार दत्तात्रय भरणे यांनीही इंदापूरच्या उमेदवारीचा निर्णय हे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे घेतील व तो मला मान्य असेल असे सांगितले. परंतु सेटिंग आमदारचा निकष लागल्यास आमदार दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड असल्याचे जाणवते त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकात थोडीशी धास्ती दिसून येत असून पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते करत आहेत.

महायुतीची उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच इंदापूर तालुक्यात उत्साही कार्यकर्त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना असलेले “विमान” हे चिन्ह सोशल मीडियात व्हायरल करत करा “विधानसभेची” तयारी आम्ही सज्ज असा उल्लेख केला आहे.

इंदापूर शहरात कार्यकर्त्यांनी “आमचा” स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरलंय.. म्हणत लागा तयारीला २०२४.अशा स्वरूपाचे बॅनर इंदापूर शहरात लावले आहे.

यावर मात्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून यापूर्वी बोलताना पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील असे मत व्यक्त केले आहे.

काय आहे “विमान” या चिन्हाचा इतिहास.?

१९९९-२००४ ची विधानसभा माजी मंत्री पाटील हे अपक्ष म्हणून विमान या चिन्हावर लढले होते. त्यावेळी विकास आघाडी या संघटनेच्या वतीने गाव तेथे शाखा खोलत कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा सहकारी संस्थांच्या हर्षवर्धन पाटील गटाचे विमान हे चिन्ह फिक्स.. त्यावेळी प्रचाराला येणाऱ्या जीप गाडीतून एकच आवाज यायचा “भूर” भूर भूर भूर वाजतं काय.. हर्षवर्धन भाऊंचे विमान आलं ग बाय.. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत हर्षवर्धन भाऊंचे विमान हे तोंडपाठ झाले होते. गावगाड्यात ग्रामपंचायत निवडणुकीतही कार्यकर्ते भांडून विमान हें चिन्ह घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here