विजय शिंदे
इंदापूर : कोणती ही शास्त्रीय पदवी नसताना संशोधन करणारा,असंख्य संकटावर मात करुन काळ्या मातीमधून सोने पिकवणारा जगातील सर्वात हिंमतवान धाडसी योध्दा म्हणजे शेतकरी आहे, असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी काढले.
इंदापूर पंचायत समिती,तालुका कृषी विभाग यांच्या वतीने कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. गटविकास अधिकारी खुडे यांच्या हस्ते पंंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
गटविकास अधिकारी खुडे, प्रगतीशील शेतकरी राजेंद्र गिरमे, पंचायत समितीचे तालुका कृषि अधिकारी अमर फडतरे, तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, कृषि विस्तार अधिकारी अजित घोगरे, युनुस शेख,टी.आर.गवारी यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
या वेळी बोलताना गटविकास अधिकारी खुडे म्हणाले की,शेतक-यांनी सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पध्दतीने शेती करावी.
महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण मिळवणारे वरकुटे बुद्रुक येथील शेतकरी विजयसिंह बालगुडे यांच्यासह कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, सेंद्रिय खतांचा वापर करुन शेती करणारे संतोष कुदळे ( पिटकेश्वर),आनंद कोरंटक (नृसिंहपूर), पांडुरंग बरे ( कचरेवाडी), जगन्नाथ भोंग ( इंदापूर), राजेंद्र गिरमे ( बावडा), श्रीरंग देवडे ( निरनिमगाव), अविराज निंबाळकर ( शेटफळ हवेली) यांचा या वेळी शाल, श्रीफळ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कृषी विस्तार अधिकारी युनूस शेख यांनी केले. सूत्रसंचालन पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी केले. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी आभार मानले.
मंडल कृषी अधिकारी योगेश फडतरे, मंडल कृषी अधिकारी सूर्यवंशी,पिसाळ, ग्रामसेवक, शेतकरी,कृषी सहाय्यक कार्यक्रमास उपस्थित होते.