विजय शिंदे
सध्या बहुचर्चित असलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता तालुकास्तरावर समिती नेमून त्यावर राजकीय कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समितीच्या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीसह आपल्या पक्षाच्या लाडक्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून महायुती सरकारने आपापल्या पक्षाच्या प्रचारासह कार्यकत्यांचेही पुनर्वसनाचा हेतू साध्य केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी आता तालुका पातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे.विशेष म्हणजे या समितीवर तीन अशासकीय सदस्य म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. एका कार्यकर्त्याला या समितीचे अध्यक्षपद सोपविले जाणार आहे. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्रीच या सदस्यांची निवड करणार आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी ही समिती असल्याने तीन अशासकीय सदस्य म्हणून महायुती मधील कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
अशासकीय सदस्यांशिवाय सात सदस्य हे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत. तर सदस्य सचिव हे तहसीलदार आहेत. समितीमध्ये गटविकास अधिकारी, समाज कल्याणचे अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी, संरक्षण अधिकारी यांचा समावेश आहे.
अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी…
प्रत्येक तालुक्यात तीन अशासकीय सदस्य निवडीचे अधिकार हे पालकमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे महायुती मधील तीन पक्षांना तालुक्यातील समितीमध्ये स्थान मिळणार आहे. तर एकाला अध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे या समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे, यासाठी सुध्दा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणत्या तालुक्याचे अध्यक्षपद द्यायचे याचा सुध्दा फॉर्म्युला आता तिनही पक्षांना एकत्रित बसून ठरवावा लागणार आहे. तीन सदस्य असल्याने तीनही पक्षांना या समितीमध्ये स्थान दिले जाणार हे निश्चितच आहे. यातील एकाला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
या समितीचे मुख्य काम योजनेवर देखरेख व सनियंत्रण करणे, अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे, कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, अर्जाची छाननी करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे हे आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे या योजनेवर या अशासकीय सदस्यांचे वर्चस्व राहणार आहे. ही योजना आमच्याच पक्षाच्या माध्यमातून राबवली यासाठी या नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत.