विजय शिंदे
विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या इंदापूरचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अशातच महायुतीत सुरु असलेल्या कुरघोड्या नंतर राष्ट्रवादी मधील गटबाजी समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी मधून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर लावलेला बॅनर चर्चेत असताना आता पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांनी ही गारटकर यांना फिक्स भावी आमदार अशा आशयाचा बॅनर लावला आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर समर्थकांनी आमच आता ठरलय म्हणत विमान या चिन्हाचे बॅनर इंदापूर शहरात लावले त्याच बॅनर शेजारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असतील असा बॅनर लावला. त्यानंतर यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही उडी घेत आता “कसं साहेब म्हणतील तसं” इंदापूरचा आमदार पवार साहेबच ठरवणार असा बॅनर लावला.
दोन-तीन दिवस जातात तोपर्यंत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारकर यांच्या समर्थकांनी ही बॅनर युद्धात उडी घेतली असून प्रदीप गारटकर हेच इंदापूरचे भावी आमदार असा उल्लेख या बॅनर वरती करण्यात आला आहे. पहचान बताने की जरूरत नही, लोग हमे नाम से ही पहचान जाते है, लक्ष नाही फिक्स आहे असा उल्लेख या बॅनर वर करण्यात आला आहे.
त्यामुळे महायुतीतील भाजप- राष्ट्रवादी व राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्ष यांच्या उमेदवारीच्या दाव्याने इंदापूर मधून उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. इंदापूरचा उमेदवार ठरवताना महायुती तसेच महाविकास आघाडी च्या नेतृत्वापुढे मोठी डोकेदुखी असल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत प्रदीप गारटकर.?
प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, शरद पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून गारटकर यांची ओळख होती परंतु राष्ट्रवादीच्या फुटी नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. इंदापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असणारे गारटकर हे पूर्वी पतीत पावन संघटना,भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. विधानसभेच्या सलग तीन निवडणुका त्यांनी लढवल्या परंतु त्यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पराभव केला. इंदापूर नगर परिषदेची सत्ता पंधरा वर्षे गारटकर यांच्या नेतृत्वाखाली होती.