विजय शिंदे
विधानसभा निवडणुकीला आणखी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला आहे.विद्यमान आमदार यशवंत माने हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि त्यांना ४४ हजार मताधिक्क्याने निवडून आणायाचे आहे, असेही राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी (ता. 0७ जुलै) मोहोळ येथे आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून टाकला. या मेळाव्याला आमदार यशवंत माने माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजन पाटील म्हणाले, कोणीही गाफील राहू नका. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आजपासूनच सुरुवात करा. यशवंत माने यांना प्रत्येक गावांतून मागील निवडणुकीपेक्षा जादा मताधिक्य मिळाले पाहिजे, ही खबरदारी गावोगावचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. आपल्याला आमदार माने यांना मागील मागच्या पेक्षा जादा मताधिक्याने निवडून आणायचे आहे.
माझ्याकडे अनेक लोक भेटायला येत असतात, त्यामुळे तुम्ही, मीडिया संभ्रमात असेल. म्हणून मी आजच सांगतो. आपल्या आणि बाबूराव अण्णांच्या विचारांचा, प्रामाणिकपणे काम करणारे उमेदवार हे यशवंत मानेच असतील. आगामी विधानसभा निवडणुकीतील आपले उमेदवार हे यशवंत माने हेच असतील. याची खूणगाठ बांधून आपण सर्वांनी त्यांचे काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.