विजय शिंदे
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे, पालघरचे महानगर पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा घेण्यात आला.
या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, वरिष्ठ निवडणूक उपायुक्त नितेश व्यास, निवडणूक उपायुक्त हिर्देशकुमार, वरिष्ठ प्रधान सचिव (मतदार यादी) एन.एन.बुटोलिया, महाराष्ट्राकरिता नियुक्त सचिव सुमनकुमार दास, सचिव (मतदार यादी) पवन दिवान तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह ठाणे व पालघर महानगर पालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह ठाणे जिल्हाचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांद्वारा जिल्हाधिकारी यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचनाही केल्या.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अत्युंग इमारतीमध्ये तसेच 200 पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील अत्युंग इमारती आणि समुह सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, मतदार यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदार नावे समाविष्ठ करणे यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा, नवीन मतदान केंद्रे उभारणे, मतदार यादीत मतदार कार्डांची छपाई व वितरण त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्याही सूचना भारत निवडणूक आयोगाकडून यावेळी करण्यात आल्या. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदीबाबतही भारत निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली.
या बैठकीनंतर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, डॉ.सुखबीर सिंग संधू यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.
000