अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर..

विजय शिंदे

प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात उद्या, ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अतीवृष्टीच्या काळात नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here