खासदार सुप्रिया सुळे- राजवर्धन पाटील यांची भेट तर प्रवीण माने यांच्या घर वापसीची ही चर्चा..

विजय शिंदे

जसजसे महाराष्ट्राच्या विधानसभेचे बिगुल वाजू लागले आहेत तसतसे इंदापूर तालुक्यात नवनवीन घटना घडत आहेत, विधानसभेसाठी महायुती व महाविकास आघाडी मध्ये इच्छुकांची संख्या वाढली असून कार्यकर्त्यांसोबतच नेते तयारीला लागले आहेत. रोज नवनवीन घटना घडत असून महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत मात्र शेवटपर्यंत  संभ्रम राहण्याची शक्यता आहे.

खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र  राजवर्धन पाटील यांच्या भेटीने व चर्चेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईमध्ये एका लग्न समारंभामध्ये मंगळवारी ही भेट झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. इंदापूर विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये स्टॅंडिंग आमदार या निकषानुसार विद्यमान आमदारांकडे जाईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार, जिंकणार व गुलाल आमचाच!! अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरती खा. सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या भेटीने, विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष हा हर्षवर्धन पाटील यांना मदत करणार का, अशी चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये सध्या सुरू झाली आहे.

पवार साहेब हर्षवर्धन पाटलांना सहकार्य करणार?
——————————————

जेष्ठ नेते शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांचे असलेले चांगले व्यक्तिगत संबंध राज्याला माहित आहेत. त्यातच खा. सुप्रिया सुळे व राजवर्धन पाटील यांच्या झालेले भेटीने पवारसाहेब हे इंदापूर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना सहकार्य करणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
________________________

प्रवीण माने तुतारी हाती घेणार..?

२०२४ लोकसभा निवडणुकी वेळी प्रवीण माने यांनी शरद पवार यांचे साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय हा राजकीय दबावापोटी असल्याची चर्चा होती. इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यात अनेक अदृश्य हात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रवीण माने यांची घर वापसी होणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here