महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणी अभियानाचा लाभ घ्यावा – अंकिता पाटील- ठाकरे

विजय शिंदे

 

महिला वर्गाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक आधार प्राप्त होणार आहे. त्यामुळे या योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, यासाठी अर्ज नोंदणी अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.
बावडा (ता.इंदापूर) येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागासाठी मोफत अर्ज नोंदणी अभियान शुभारंभ अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10) करण्यात आला. सदर प्रसंगी अंकिता पाटील ठाकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.


ग्रामीण भागातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होणेसाठी हेलपाटे पडू नयेत, सुलभतेने त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे अभियान उपयुक्त असल्याचे प्रतिपादन भाषणात अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या सुचनेनुसार सदर अभियान राबविण्यात येत आहे. पुढील 7 दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत बावडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नोंदणी कक्ष चालू असणार आहे, अशी माहिती निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी दिली.
याप्रसंगी सरपंच पल्लवी गिरमे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष सुर्यवंशी यांनी केले. यावेळी माजी सरपंच किरण पाटील, विकास पाटील, पवनराजे घोगरे, रणजित गिरमे, महादेव शिंदे, सचिन सावंत, ब्रह्मदेव कदम, महेंद्र कवडे देशमुख, राजेंद्र घोगरे, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावसे उपस्थित होत्या. आभार उपसरपंच रणजीत घोगरे यांनी मानले.
______________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here