विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेच्या निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. १४ जुलैला बारामतीत त्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.
मिशन हायस्कूलच्या मैदानावर १४ जुलैला दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. जनसन्मान महामेळावा असे या सभेचे नामकरण करण्यात आले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यापासून ते राज्यातील सर्व आमदार, मंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या सभेपासून पुढे विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या दौऱ्याबाबत कळवण्यात आले असून त्यावेळी पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात यावे अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मर्यादित कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, तशी घोषणा उद्याच्या कार्यक्रमात होऊ शकते अशी चर्चा आहे.
प्रवीण माने यांची भूमिका काय.?
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी ऐन लोकसभेवेळी सुप्रिया सुळे यांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हा निर्णय हा दबावापोटी घेतला असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात होती, तेच प्रवीण माने आज शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात आहे, प्रवीण माने यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये होत आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्ताने राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी लावलेल्या बॅनर वरती शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या सोबतच प्रवीण माने यांचाही फोटो लागला त्यामुळे प्रवीण माने हे उद्या होणाऱ्या जाहीर सभेसाठी जाणार .? याकडे इंदापूर तालुक्यातील मतदारांचे लक्ष आहे.