विजय शिंदे
तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असताना माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जणांची यादीवर अखेरपर्यंत निर्णय झाला नाही. त्या नियुक्त्यांचा विषय न्यायालयात गेला.
यातील काही नावांवर आक्षेप घेत या नियुक्त्यांना मुहूर्त अद्याप लागलेला नाहीय. अजूनही या नियुक्यांवर कोर्टात सुनावणी सुरूय. परंतु याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या नियुक्त्यांचा मुहूर्त लागला असल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. यातच पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी विधान परिषदेमधील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नेमणुकीचा मुहुर्त ठरला असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या नियुक्त्या होणार असल्याचे समजत आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांना येत्या काही दिवसात सादर केला जाऊ शकतो. त्यावर राज्यपालांकडूनही तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याप्रमाणे आक्षेप घेतला जाणार नसल्याचे सत्य आहे.
पुढील काही दिवसांत सत्ताधारी पक्षातील तिन्ही नेत्यांना विधान परिषदेत पाठवण्याची संपुर्ण तयारी सरकारने केल्याचे समजत आहे. या नियुक्त्यांवर मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा काही परिणाम होणार नाही. याची दक्षता सरकारला घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, महायुतीत सध्या भाजपसह अजित पवार आणि शिंदे गट आहेत. अशातच १२ जागांपैकी सर्वात जास्त आमदार असलेल्या भाजपच्या वाट्याला ०६ जागा येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना प्रत्येकी तीन जागा वाट्याला येणार आहेत. त्यामुळे या जागांसाठी आता कुणाची लॉटरी लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आमदारांची निवड कशी होते.?
राज्यपाल नियुक्त सदस्यांना सहकार चळवळ, साहित्य, विज्ञान किंवा समाजसेवेचा विशेष अनुभव किंवा ज्ञान असले पाहिजे असे आपले संविधान सांगते. यामधून राज्य सरकारने सुचवलेल्या १२ व्यक्तींची आमदार म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती राज्यपाल करतात.