विजय शिंदे
पाच वर्षांपर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली, मला वाटलं साधा माणूस आहे. शब्दाला किंमत देईल. त्यांनी म्हटलं की काही झालं तरी पवार साहेबांना सोडणार नाही. पण मुंबईत गेल्यानंतर हा भलतीकडेच जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवायची वेळ आली आहे,आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठिशी शक्ती उभी करा. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलल्याशिवाय राहाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष(sp) खा शरद पवार यांनी अकोले येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना दिला.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा शरद पवारांनी केली. या मतदारसंघात अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे आमदार आहेत. त्यांना आता खाली बसवण्याची वेळ आली असल्याचे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी राज्यात २२५ जागा जिंकणार असल्याचा दावा केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. त्या आकडेवारीचा आधार घेत पवारांनी महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार जिंकणार असल्याचे म्हटले. महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येणार म्हणत पवार स्वस्थ बसलेले नाहीत, तर त्यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये पवारांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात आयोजित शेतकरी मेळाव्याला पवारांनी हजेरी लावली.
यावेळी शरद पवारांनी डॉ. लहामटे यांचा नामोल्लेख टाळत म्हटले की, अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमचे सहकार्य असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहाणार नाही.
शरद पवारांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अकोलेत डॉ. किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित भांगरेंच्या पाठीशी उभे राहा म्हणत त्यांनी अकोलेतील लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार असल्याचे संकेत दिले.
अमित वर लक्ष ठेवा..
शरद पवार म्हणाले, मला आठवतंय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो, त्याठिकाणी अशोकराव होते. भाषणाला उभे राहिले आणि अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेची एकच गोष्ट सांगितली मला की पवारसाहेब, आमचं तुमच्याकडून काही मागणं नाही फक्त एकच काम करा “माझ्या मुलावर लक्ष ठेवा” अमितच्यावर लक्ष ठेवा. अमितवर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतून माझ्याकडून घेतला. अशोकरावांच्या डोळ्यात पाणी होतं पण चिंता नुसती अमितची नव्हती तर अकोल्याच्या गोरगरीब जनतेची होती आणि त्या जनतेची, त्यासाठी कष्ट करणार, त्याच्यासाठी बांधिलकी ठेवणार, त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणार ही त्यांची अपेक्षा अमित आणि सुनिता ताईंकडून होती. मला आनंद आहे की, आज त्यांचा शब्द तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला.