विजय शिंदे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नाट्यात अनेक स्थित्यंतरे होताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण राजकीय नाट्यात कलाटणी आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात बऱ्याच जणांनी प्रवेश केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवारांच्या अनेक समर्थकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच दादांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार आहेत. अजित पवार गटाच्या एका आमदाराने शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या भेटी वेळी खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते.
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट झाली आहे. याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. “अतुल बेनके हे आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला याची कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळं यावर फार चर्चा नको. पण लोकसभेत ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे आहेत ” असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच करण्यात आले आहे. या भेटीने मात्र अजित पवारांचे फासे उलटे फिरण्याची शक्यता आहे.