विजय शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस. मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व, रांगडा गडी, न पटणारं वय, असं सरळ वर्णन अजित पवार यांचं करावं लागेल. अजित पवार हे ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अजित पवारांकडे बघून ते ६५ वर्षांचे आहेत असं कोणाला पटणारही नाही. स्पष्टवक्ता, मनमोकळा स्वभाव, अथक मेहनत करणारा नेता आणि प्रशासनावर हुकूमत असलेला नेता म्हणून अजितदादा यांची ख्याती आहे.
काम होत असेल तर तिथल्या तिथे सोक्ष-मोक्ष, पण काम होणार नसेल तर नाही म्हणून स्पष्टपणे सांगणे अशी अजित पवारांची ख्याती आहे. गावरान भाषेला याठिकाणी…त्याठिकाणी अशा शब्दांची जोड देऊन केलेली भाषणं कुणाची असं जर कुणी विचारलं, तर डोळे झाकून लोक अजित पवारांचं नाव घेतील.कशाची तमा न बाळगता जे आहे ते बोलणारा नेता म्हणून अजित पवारांना ओळखलं जातं.
त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे किस्से नोंदले जातात तर कधी माध्यमांच्या हेडलाईन्स बनतात. संभ्रम होण्याऐवजी स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभावगुण. नगर जिल्ह्यातील प्रवरात 22 जुलै 1959 रोजी अजित पवारांचा जन्म झाला. देवळालीत शिक्षण झालं. त्यानंतर 1982 मध्ये अजित पवारांची पॉलिटिकल इनिंग सुरु झाली. साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार झळकू लागले. मात्र सक्रीय राजकारणात अजित पवारांची एण्ट्री झाली ती 1991 मध्ये. अजित पवार बारामतीतून खासदार बनून 1991 मध्ये दिल्लीत गेले.
दिल्ली तेव्हा राजकीय दृष्ट्या अस्थिर होती. त्यामुळे शरद पवारांसाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार पुढे नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री बनले. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाले. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले.
अजित पवारांचा प्रवास
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
नाव : अजित अनंतराव पवार
जन्म : 22 जुलै 1959.
जन्म ठिकाण : देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
शिक्षण : बी. कॉम.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा
अपत्ये : एकूण 2 (दोन मुले)
व्यवसाय : शेती
पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मतदारसंघ : 201-बारामती, जिल्हा पुणे.
इतर माहिती : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई : 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ; 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री : 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री : 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर ते राज्याचे विरोधी पक्षनेते झाले.
अजितदादांनी पक्षात बंड केल्यानंतर भाजपशी हात मिळवणी केली. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे राज्याचं अर्थ खातंही आहे.